बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
प्रियंका खकाळ असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. सासरच्या मंडळींनी तिचा अतोनात छळ केल्याने तिला टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे प्रियंकाच्या माहेरच्या मंडळींचा आरोप आहे.
advertisement
तेरा वर्षांपूर्वी प्रियंका यांचा विवाह बापू खकाळ याच्याशी झाला होता. मात्र अशात नवीन घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन ये, अशी मागणी करत प्रियंकाला सतत जाच केला जात असे. याच जाचाला कंटाळून प्रियंकाने विषारी द्रव्य प्राशन करत आपले जीवन संपविले आहे. दरम्यान या प्रकरणात सासरा, सासू, दीर, जाऊ या चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुण्यातील वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपवले
पुण्यातील भुकूम गावातील वैष्णवी हगवणे या तरुणीने पैशासाठी सततच्या छळाला कंटाळून गेल्या महिन्यात आपले जीवन संपवले. वैष्णवी ही राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून होती. 16 मे रोजी वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले गेले. मात्र नंतर त्यांच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आढळले. पुणे पोलीस वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करीत आहेत. वैष्णवीचा पती, सासू, सासरा, नणंद आणि दीर आरोपी म्हणून तुरुंगात आहेत.
