काय म्हणाले विजयसिंह बाळा बांगर?
गोट्या गिते हा सायको किलर आहे. बीडमधील बहुतांश हत्याकांडात गोट्या गिते याचा हात आहे. महादेव मुंडे हत्याकांडात देखील त्याचा हात आहे. आधी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आली नाहीये. गोट्या गिते सोशल मीडियावरून व्हिडीओ टाकून लोकप्रतिनिधींना जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. वाल्मिक कराडचा भक्त असल्याची गोट्या गिते याने जाहीर कबुली दिली आहे, असं विजयसिंह बाळा बांगर यांनी म्हटलं आहे.
advertisement
जितेंद्र आव्हाड यांची रेकी
गोट्या गीते आणि तांदळे नावाच्या दोघांनी मला, आमदार सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. मागच्या ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये या दोघांनी मुंबईमध्ये जाऊन जितेंद्र आव्हाड यांची रेकी केली होती, असा खळबळजनक दावा वाल्मीक कराडचे एकेकाळचे सहकारी बाळा बांगर यांनी केला आहे. त्यावेळी त्याने गोट्या गितेच्या अटकेची मागणी केली आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीची हत्या झाल्यावर त्याला अटक करणार आहात का? असा सवाल पोलिस प्रशासनाला केला आहे.
गोट्या गीते आहे कोण?
गोट्या गीतेची गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी आहे. बीड, परभणी, लातूर आणि पुणे अशा विविध जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर एकूण 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, खंडणी, मारहाण आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याला अनेकदा अटकही करण्यात आली आहे. परळीतील सातभाई मारहाण प्रकरणात त्याच्यावर 'मकोका' अंतर्गत कारवाई देखील करण्यात आलेली होती. सध्या महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी पोलीस त्याचा कसून शोध घेत असून, लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
