अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक
बीडच्या परळी येथील रेल्वे स्थानक परिसरात बालकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशन तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासले होते. यामध्ये सदर आरोपी बालिकेला सोबत घेऊन जाताना दिसून आला होता, त्यानुसार परळी शहरातील बरकतनगर भागातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
advertisement
रेल्वे स्टेशनवर नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या वेळी पंढरपूर येथून एक कुटुंब मुलांसह परळी रेल्वे स्थानकावर आले होते. दुपारी साधारण तीनच्या सुमारास त्यांनी रेल्वे स्टेशनवरच जेवण करून थोडा वेळ विश्रांती घेतली. त्याचवेळी एका नराधमाने सहा वर्षांच्या चिमुकलीला फसवून स्थानकावरील उड्डाणपुलाकडे नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अत्याचारानंतर आरोपी पसार झाला होता.
सीसीटीव्हीचा तपास अन् आरोपी सापडला
दरम्यान, पोलिसांनी तातडीने प्रकरण हाती घेतलं अन् आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीचा तपास केल्यानंतर आरोपी चिमुकलीला हाताला धरून घेऊन जाताना दिसत आहे. आता पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून अधिकची चौकशी केली जात आहे.
