गडावरील या दुर्गम दरीच्या भागात काही स्थानिक नागरिक सरपण गोळा करण्यासाठी गेले असताना त्यांना मानवी अवशेष दिसून आले. ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरल्यानंतर अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरी खोल आणि दुर्गम असल्याने पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठ्या कसरतीचा सामना करावा लागला.
advertisement
या घटनेतील एका मृताची ओळख निलेश नारायण घोंगरे (वय 26, रा. बेलापूर खुर्द, जि. अहिल्यानगर) अशी पटली आहे. निलेश हा साधारण महिनाभरापूर्वी या गडावर दर्शनासाठी आला होता, मात्र तिथूनच तो गूढरित्या बेपत्ता झाला होता. याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी अंभोरा पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रारही नोंदवली होती. दरीत सापडलेला सापळा निलेशचाच असल्याचे समजताच त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच टाहो फोडला.
दुसरा मृतदेह दिनकर नाना घडशिंग (वय 65, रा. भिलवाडा, पाथर्डी) या वृद्धाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ते भोळसर प्रवृत्तीचे असल्याने किंवा गडावर फिरत असताना रस्ता चुकल्याने त्यांचा पाय घसरून ते दरीत पडले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. एकाच वेळी दोन मृतदेह सापडल्याने या घटनेमागे काही घातपात तर नाही ना, या दिशेनेही चर्चा सुरू झाली आहे.
