वाल्मीक कराडचा बॅनरवर फोटो
परळी शहरातील दोन्ही पोलीस ठाण्यासमोर आणि नगर परिषदेच्या अगदी जवळच लावलेल्या बॅनरवर एका गुन्हेगाराचा फोटो झळकला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा फोटो ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देणाऱ्या आणि स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर दिसून आला आहे. या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस युवक नेता असा उल्लेख असून, त्यात आमदार धनंजय मुंडे यांचाही फोटो आहे.
advertisement
कायद्याचं राज्य आहे की नाही?
पोलिसांच्या आणि नगर परिषदेच्या समोरच हे बॅनर लावण्यात आल्याने आता जिल्हाधिकारी प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीडमध्ये आता कायद्याचं राज्य आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. तसेच बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा चौकात लक्ष्मण हक्के यांच्या समर्थकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याची माहिती देखील समोर आली होती.
वाल्मीक कराडच्या अडचणी वाढणार?
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड यांचा मुख्य सूत्रधार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांच्या न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर वाल्मीक कराडचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.