तिघांकडून एकाला जबर मारहाण
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन व्यक्तींकडून एका चौथ्या व्यक्तीला मारहाण केली जात होती. सुमारे दहा मिनिटं हा मारहाणीचा प्रकार भर रस्त्यावर सुरू होता. या हाणामारीमुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती आणि काही काळ वाहतूक ठप्प झाली. भरदिवसा आणि थेट पोलीस दलाच्या मुख्य कार्यालयासमोरच हा प्रकार घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
पोलिसांची मध्यस्थी अन् वाद मिटला
अखेरीस, एका स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करत हे भांडण थांबवले. या घटनेतील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेने बीड शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हाणामारीचे आणि त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होण्याचे प्रमाण पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पोलीस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत.
बीडमध्ये चाललंय काय?
दरम्यान, बीड जिल्ह्यामध्ये वैयक्तिक वादांना जातीय रंग देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रकार वाढले आहेत. किरकोळ कारणांवरूनही मारामारी आणि दगडफेकीच्या घटना घडत आहेत. 2024 या वर्षात दखलपात्र आणि अदखलपात्र असे 237 जातीय गुन्हे दाखल झाले आहेत. लोकसभेच्या निवडणुकांनंतर याचे प्रमाण वाढल्याचे दिसतंय. सार्वजनिक ठिकाणी, अगदी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरही हाणामारीच्या घटना घडत आहेत आणि त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. 2024 या वर्षात 40 खुनाचे, तर खुनाचा प्रयत्न केल्याचे 191 गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल 308 खुनाचे गुन्हे नोंदवले गेले आहेत.
