कृष्णा आंधळेला लगेच अटक करा - धनंजय देशमुख
फरार असलेल्या कृष्णा आंधळेला लगेच अटक करा, अशी आमची मागणी आहे. लवकरच मी कठोर निर्णय घेणार आहे. आरोपींना जेल प्रशासनाकडून व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे. त्यामुळे आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात पाठवण्यात यावं, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या गाड्या, पदाधिकारी, आरोपींचे समर्थन करणारे लोक मोठ्या प्रमाणात येत देशमुख कुटुंबावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप देखील धनंजय देशमुख यांनी केला आहे.
advertisement
मी कठोर निर्णय घेणार - धनंजय देशमुख
आरोपींकडून भीतीयुक्त वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. कृष्णा आंधळे 204 दिवसांपासून फरार आहे. त्याच्यापासून आमच्या जीविताला धोका असल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी मी कठोर निर्णय घेणार आहे, अशी घोषणा धनंजय देशमुख यांनी केली आहे. असं काही झालं तर संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल. या मागणीची गंभीर दखल घ्यावी, असा इशारा देखील धनंजय देशमुख यांनी दिला आहे.
आरोपी परळीच्या कारागृहात
दरम्यान, वाल्मीक कराड यासह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे हे अन्य आरोपी आहेत. यातील कृष्णा आंधळे हा फरार असून अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपी सध्या परळीच्या कारागृहात आहेत.