विलास भारत म्हस्के असं हल्ला झालेल्या ३२ वर्षीय शिवसेना पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बीड समन्वयक आहेत. म्हस्के यांच्यावर गुरुवारी मध्यरात्री घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला. आर्थिक व्यवहारातून व्यावसायिक भागीदारानेच हा हल्ला घडवून आणल्याचा संशय म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास मस्के गुरुवारी रात्री आपल्या घरात झोपले होते. मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा कुणीतरी वाजवला. यावेळी म्हस्के यांच्या बहिणीने दार उघडले असता, एका अनोळखी व्यक्तीने 'गाडीतील पेट्रोल संपले आहे, पेट्रोल हवे आहे,' असे कारण सांगितले. अपरात्री एक अनोळखी व्यक्ती मदत मागत असल्याने विलास म्हस्के बाहेर आले. ते बाहेर येताच दबा धरून बसलेल्या अन्य चार ते पाच जणांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.
advertisement
या हल्ल्यात विलास म्हस्के यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विलास म्हस्के यांच्या तक्रारीवरून त्यांच्या व्यावसायिक भागीदारासह अनोळखी पाच हल्लेखोरांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. व्यावसायिक वादातून हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
