मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील कॅनाल रोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेला सोमवारी पहाटे प्रसूतीवेदना सुरु झाल्या. कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात नेण्यासाठी कारची व्यवस्था केली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच कारमध्येच प्रसूती झाली. त्यानंतर डॉक्टर उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानुसार, बाळ, माता, इतर दोन महिला आणि चालक असे पाच जण जिल्हा रुग्णालयाकडे निघाले. मात्र, पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आल्यावर कारमधील रक्त पाहून चालकाला अचानक चक्कर आली. परिणामी कारवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन उलटले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
नागरिकांनी कारचा दरवाजा तोडून आत अडकलेल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. सर्वप्रथम बाळ आणि मातेला बाहेर आणून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर चालक आणि इतर दोन महिलांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. वाहन मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाले.
सध्या माता आणि बाळावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून त्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे
या घटनेने बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. महिलेवर तात्काळ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आई व बाळ दोघेही सुरक्षित असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा प्रसंग चमत्कारिक मानला जातो.
