धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रकरण समोर येताच धनंजय मुंडे अज्ञातवासातून परतले आहेत. कोचिंगच्या मालकांनी आणि पार्टनरने भगिनींवर अत्याचार केला, त्याच्यावर राजकीय वरदहस्त आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली अन् या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी दोन्ही नेत्यांची भेट घेतली.
advertisement
धनंजय मुंडे काय काय म्हणाले?
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजित पवार यांची भेट घेऊन बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत माहिती दिली, असं धनंजय मुंडे म्हणाले. तसेच या प्रकरणात सर्व पालक संशय व्यक्त करत आहेत त्याप्रमाणे आणखी काही मुलींवर देखील असे अत्याचार झाले आहेत, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
दोषींना कठोर शिक्षा द्यावी - धनंजय मुंडे
अत्याचाराची सर्व प्रकरणे समोर येणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आरोपी, त्यांना मदत करून पाठीशी घालणारे याची सखोल चौकशी केली जावी व दोषींना कठोर शिक्षा दिली जावी, यासाठी बीड जिल्ह्याबाहेर सेवेत असलेल्या अनुभवी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) नेमून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जावा अशी आग्रही मागणी केली.
सकारात्मक निर्णय घेणार?
मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले असून, बीड प्रकरणातील संपूर्ण सत्य नक्कीच बाहेर येईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
दरम्यान, बीडसह राज्यात सर्वच ठिकाणी खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना फी मर्यादा, वसुलीची पद्धत, विद्यार्थ्यांची सुरक्षा याबाबत नैतिक व कायदेशीर संहिता असावी, यादृष्टीने एक व्यापक नियमावली शासनाने निर्गमित करावी, अशीही मागणी यावेळी केली असून याबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
