भीमराव शिवाजी राठोड असं हत्या झालेल्या २६ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील जळगव्हाण येथील रत्ननगर तांडा येथील रहिवासी होता. तर अनिल चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. आरोपी अनिल चव्हाण याने घटनेच्या दिवशी भीमरावला भेटायला बोलावलं होतं. त्यानुसार भीमराव भेटायला गेला असता आरोपीनं त्याच्यावर धारदार कोयत्याने वार करत हत्या केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल चव्हाण आणि मयत भीमराव राठोड यांच्यात घरगुती आणि प्रेम प्रकरणाच्या संशयातून वाद होता. हा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. अनिल चव्हाण याने याच वादातून भीमरावला संपवण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी, अनिलने भीमरावला रत्ननगर तांडा, जळगव्हाण येथे भेटायला बोलावले. त्यांच्यात पुन्हा एकदा याच विषयावर जोरदार बाचाबाची झाली, जी नंतर हाणामारीत बदलली. यावेळी अनिलने जवळच असलेला कोयता उचलून भीमरावच्या डोक्यात अनेक वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भीमरावचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अनिल चव्हाणचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. भेटायला बोलावून एका तरुणाची अशाप्रकारे हत्या केल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
