अभिषेक गायकवाड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर विजय सुनील काळे असं हत्या झालेल्या २३ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो बीडच्या स्वराज्यनगर परिसरातील रहिवासी होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मयत विजय काळे हा त्याचे मित्र विशाल यादव, अभिषेक काशीद, अभिषेक गायकवाड, ओम लकडे आणि आकाश कुटे यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकात होता. यावेळी विजय नशेत होता. काही वेळाने ओम आणि आकाश घरी निघून गेले. यानंतर विजयने आकाशला फोन लावला, पण फोन लागला नाही. यामुळे संतापलेल्या विजयने दारूच्या नशेत आकाशला आईवरून शिवीगाळ केली.
advertisement
ही शिवीगाळ ऐकून अभिषेक गायकवाडने विजयसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढत गेल्याने चौघेही (विजय, अभिषेक गायकवाड, विशाल यादव आणि अभिषेक काशीद) महाराणा चौकात गेले. तिथे अभिषेकने रागाच्या भरात चाकू काढून विजयच्या छातीत खुपसला. गंभीर जखमी झालेल्या विजयला त्याच्या मित्रांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
खुनानंतर आरोपी अभिषेक गायकवाडने मित्राची दुचाकी घेतली आणि मामाच्या गावी, काकडहिरा येथे पळून गेला. तिथे त्याने दुचाकी झाकून ठेवली आणि शेतात लपून बसला. बराचवेळ शेतात लपल्यानंतर त्याला भूक लागली. भूकेनं व्याकूळ होऊन तो शेतातून बाहेर येताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.