ही हृदयद्रावक घटना बीड शहरात घडली आहे. राजेश राजेंद्र शिकलकरी (वय ८, रा. नागोबा गल्ली, बीड) असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. फटाके न फुटल्याने त्यातील दारू जमा करण्याचा आणि ती पेटवण्याचा प्रयत्न या मुलाने केला होता. पण ही चूक त्याला चांगलीच महागात पडली. फटाक्यांची दारू अचानक पेटल्याने राजेशचा चेहरा गंभीररित्या भाजला. त्याच्या डोळ्याला मोठी इजा झाल्याने त्याला दृष्टी गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, राजेशच्या डोळ्यातील ‘कॉर्निया’ (Cornea) या महत्त्वाच्या भागाला गंभीर इजा झाली आहे, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. संजय जानवळे यांनी दिली आहे. या गंभीर दुखापतीमुळे या बालकावर दृष्टी गमावण्याची वेळ येण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
डॉ. जानवळे यांनी या घटनेच्या निमित्ताने सर्व पालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. दिवाळीमध्ये फटाके फोडताना अत्यंत काळजी घ्यावी. विशेषतः लहान मुले फटाके फोडत असताना पालकांनी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे. लहान मुलांना स्वतःहून फटाक्यांशी खेळू देऊ नये आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, जेणेकरून अशा गंभीर दुर्घटना टाळता येतील, असे डॉ. जानवळे यांनी स्पष्ट केले आहे.