सोनाली अनिकेत गर्जे (वय २०, रा. जांबूरवस्ती) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ७ जुलै रोजी तिचा विवाह अनिकेत गर्जे सोबत झाला होता, मात्र लग्नानंतर लगेचच तिचा छळ सुरू झाला. सोनालीची आई दैवशाला बनवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती अनिकेत वारंवार तिला मारहाण करून त्रास देत होता. तो 'तू मला आवडत नाहीस, घरच्यांनी जबरदस्तीने माझ्याशी लग्न लावले आहे, मी तुला नांदवणार नाही,' असे बोलून तिला मानसिक त्रास देत होता.
advertisement
शिवाय, कांद्याचा व्यापार करण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये अशी मागणी करत होता. लग्नावेळी सोनालीच्या वडिलांनी आरोपींना ५ लाख रुपये दिले होते. तरीही आणखी पैशांसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. नागपंचमीला माहेरी आल्यावर सोनालीने तिच्या छळाबद्दल आपल्या आईला सांगितलं होतं.
या सततच्या त्रासाला कंटाळून सोनालीने ३१ ऑगस्ट २०२५ रोजी घरामागील विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. या प्रकरणी तलवाडा पोलिसांनी सोनालीचा पती अनिकेत गर्जे, सासरे एकनाथ गर्जे आणि सासू प्रतिभा गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. एका महिन्यातच सुरू झालेल्या या छळाने एका नवविवाहितेचा बळी घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.