शंकर तळेकर असं मृत पावलेल्या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो बीड तालुक्यातील बहादुरपूर येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, शंकर तळेकर आपल्या काही मित्रांसोबत दुचाकीवरून सौताडा रामेश्वर येथे देव दर्शनासाठी आला होता. दर्शन झाल्यानंतर सर्व मित्र धबधब्याच्या ठिकाणी पोहण्यासाठी गेले. पोहत असताना शंकर पाण्याच्या खोल भागात गेला आणि त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत शंकर पाण्यात दिसेनासा झाला.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच सौताडा गावातील रामकिसन सानप आणि त्यांच्या मित्रांनी तातडीने शोधकार्य सुरू केलं. बराच वेळ शोध घेऊनही शंकर सापडला नाही. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर शंकरचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना खोल पाण्यात न जाण्याचं आवाहन केलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
