राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. कोरोना संसर्ग आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यामुळे निवडणुका रखडल्या आहेत. 2020 पासून राज्यात अनेक वेळा निवडणुकांची तयारी झाली असली तरी, त्या प्रत्यक्ष झाल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका अधिसूचित करून घेण्याचे आणि आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाला मुंबई महापालिकेकडून प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा सादर करण्यात आला आहे. त्यानंतर सूचना हरकतीनंतर 6 ऑक्टोबर रोजी प्रभाग आराखडा अंतिम होणार आहे.
advertisement
मुंबई महापालिकेत 227 वॉर्ड असून 2017 प्रमाणेच वॉर्ड रचना ठेवण्यात आली आहे. कोस्टल रोड आणि इतर काही विकास कामांमुळे काही वॉर्डच्या हद्दीत फेरफार करण्यात आला आहे. मागील मुंबई महापालिका निवडणुकीत जबरदस्त कामगिरी भाजपने केली. मात्र, सत्ता स्थापन करण्यास बहुमत कमी पडले.
आता, यंदाची मुंबई महापालिका जिंकायची असा चंगच भाजपने बांधला आहे. सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मुंबईतील सहा जिल्हाध्यक्ष आणि महामंत्री यांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.
मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यंदाच्या निवडणुकीत भाजपने आपली ताकद दाखवून शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी-काँग्रेसविरुद्ध मोठी झुंज देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या बैठकीत आगामी निवडणुकीतील रणनीती, प्रचाराचे नियोजन, मतदारसंघनिहाय समीकरण आणि स्थानिक पातळीवरील तक्रारी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेतील आगामी निवडणूक ही केवळ स्थानिक पातळीवरील नव्हे तर राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची निवडणूक असेल. त्यामुळे पक्षाकडून प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन केले जात आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकून ठाकरे गटाला राजकारणातून निष्प्रभ करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.
