भाजपच्या अनेक नेत्यांनी शतप्रतिशतचा नारा दिला आहे. भाजपचे नेते महायुतीच्या माध्यमातून लढण्याचे बोलत असले तरी शत प्रतिशतसाठीही त्यांनी सिद्धता केलीय. त्याचं कारणही तसंच आहे. महायुतीतील मित्रपक्षांच्या काही मंत्र्यांची प्रतिमा मलिन झाल्याने त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फटका बसू शकतो. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे स्वबळावर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. मात्र भाजपसाठी शत प्रतिशतचा निर्णय सोपा नसल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय.
advertisement
भाजपनं मुंबईत महायुतीच्या माध्यमातून आणि राज्यात ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे, तिथे स्वबळावर लढण्याची रणनीती तयार केलीय. नागपूर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि मिरा-भाईंदर या महापालिकांमध्ये भाजप शत प्रतिशत ही घोषणा प्रत्यक्षात आणू शकतो. मात्र भाजपला मुंबईत महायुतीच्या माध्यमातून पालिका निवडणुकीला सामोरं जायचंय. याचाच अर्थ जिथे जास्त ताकद नाही तिथे महायुती आणि जिथे ताकद आहे तिथे शत प्रतिशत अशी व्यूहरचना तयार करण्यात आलीय. परिणामी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय गणितही समजून घेणं गरजेचं आहे.
मुंबईत मराठी भाषिकांची संख्या ३५ ते ४० टक्के आहे. तर इतर भाषिक ४० ते ४५ टक्के आहेत. त्यात उत्तर भारतीय हिंदू सुमारे १५ ते २० टक्के आहेत. आणि उत्तर भारतीय मुस्लिमांची संख्या ही १० ते १५ टक्के इतकी आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी भाषकांची एकगठ्ठा मते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडे जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर उत्तर भारतीय हिंदूंची मतं, गुजराती मंत भाजपच्या पारड्यात जावू शकतात. उत्तर भारतीय मुस्लिमांची मतं उद्धव ठाकरेंकडे आणि काँग्रेसच्या पारड्यात पडू शकतात. एकनाथ शिंदेंची शिवसेना वेगळी लढल्यास महायुतीच्या मतांमध्ये फूट पडू शकते.
महापालिकांच्या निवडणुका प्रामुख्याने कार्यकर्ते लढवत असतात. सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचं स्वप्न हे नगरसेवक होणं हे असतं. आणि त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती किंवा आघाडीसमोर अनेक अडचणी असतात. मात्र विजयी होण्यासाठी एकत्र लढणंही गरजेचं असतं. आता भाजप शत-प्रतिशतच्या दृष्टीनं पाऊलं टाकतो का, महायुतीतील घटक पक्ष मुंबई सोडून इतर शहरांमध्ये काय भूमिका घेतात आणि ठाकरे बंधू कधी एकत्र येतात? या प्रश्नांची उत्तरंच राजकारणाची दिशा ठरवणार आहेत.