मुंबई: महाराष्ट्राच्या शहरी राजकारणात भाजपने मोठा धक्का दिला आहे. इचलकरंजी, पुणे, धुळे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, पनवेल, उल्ल्हासनगर, मीरा-भाईंदर, नाशिक, नागपूर, नांदेड, सांगली आणि जालना या तब्बल 13 महानगरपालिकांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालांमुळे राज्याच्या राजकीय नकाशावर भाजपचे वर्चस्व अधिक ठळक झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव पुन्हा एकदा निर्णायक ठरल्याची चर्चा रंगू लागली आहे.
advertisement
महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मॅजिक' चालल्याचे पाहायला मिळत आहे. 29 महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) 13 ठिकाणी एकहाती सत्ता मिळवत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. इचलकरंजीपासून नागपूरपर्यंत आणि नाशिकपासून नवी मुंबईपर्यंत कमळ फुलले आहे.
महापालिका निवडणूक निकालात निकालात भाजपने आपला वरचष्मा कायम राखला आहे. खालील महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजपने निर्विवाद बहुमत मिळवले आहे:
पश्चिम महाराष्ट्र: इचलकरंजी आणि सांगलीत भाजपने विरोधकांना पुन्हा हादरा दिला.
उत्तर महाराष्ट्र: नाशिक आणि धुळे या दोन्ही महत्त्वाच्या शहरांत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले.
विदर्भ व मराठवाडा: भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये पुन्हा एकदा सत्ता राखली असून, नांदेड आणि जालन्यातही भाजपचा झेंडा फडकला आहे.
मुंबई महानगर क्षेत्र (MMR): नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, मीरा-भाईंदर यांसारख्या विकसित शहरांमध्ये मतदारांनी भाजपच्या 'विकास' मॉडेलला कौल दिला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड: येथेही मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्तावर विश्वास दाखवला.
देवेंद्र फडणवीस: विजयाचे शिल्पकार
या विजयाचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाला आणि धडाडीच्या नेतृत्वाला दिले जात आहे. फडणवीस यांनी ज्या पद्धतीने निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली आणि प्रत्येक शहराच्या स्थानिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून रणनीती आखली, त्याचेच हे फळ असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
खालील 13 महापालिकेत भाजपची सत्ता
इचलकरंजी
पुणे
धुळे
पिंपरी-चिंचवड
नवी मुंबई
पनवेल
उल्ल्हासनगर
मीरा-भाईंदर नाशिक
नागपूर
नांदेड
सांगली
जालना
विरोधकांचा सुपडा साफ
एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गड मानल्या जाणाऱ्या सांगली, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे भाजपने मिळवलेला विजय हा विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सांगलीत काँग्रेसने तर पुणे-पिंपरी चिंचवड येथे विजयासाठी अजित पवार यांनी प्रयत्न केले. परंतु त्यांचे प्रयत्न कमी पडले. शिवसेनेच्या प्रभावक्षेत्रातही भाजपने मुसंडी मारल्याने आगामी निवडणुकांसाठी भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली आहे.
