बडगुजर यांना भाजप प्रवेश दिला तर ज्यांच्यावर आरोप केले, त्यांचाच पक्षप्रवेश घडवून आणला जातो, किंबहुना त्याचसाठी आरोप केले जातात, या विरोधकांच्या आरोपाला बळ मिळेल, असे भाजपमधील काही नेत्यांना वाटते. मात्र दुसरीकडे बडगुजर भाजपप्रवेश करून पक्षाचे नियम पाळत असतील आणि विचारधारा अंगीकारत असतील तर आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे म्हणत त्यांच्या प्रवेशाचे स्वागतही केले जात आहे. भाजप नाशिक जिल्ह्याचे महानगर अध्यक्ष सुनील केदार यांनी तर बडगुजर यांचे स्वागत करताना भाजप हे वॉशिंग मशीन असल्याची कबुलीच दिली आहे.
advertisement
...तरच ते भाजपात येतील
सुनील केदार म्हणाले, इतर राजकीय पक्षांमधून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजपाचे प्राथमिक सदस्य होण्यास काहीही अटी शर्ती नाही. त्याकरिता मो.नं. ८८००००२०२४ डायल करून ऑनलाईन पद्धतीने देशातील कोणालाही भाजपचे प्राथमिक सदस्य होता येते. तथापि भाजपची कार्यपद्धती पाहता जे जे पक्षात येतील, त्यांच्या कोणत्याही अटी शर्ती नसतील. त्यांना भाजपची कार्यपद्धती, ध्येय धोरणे अंगिकारावीच लागतील. तरच ते भाजपात येतील.
वॉशिंग मशिनचा अर्थच असा आहे की...
इतिहास साक्षी आहे की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊ शकतो. त्यानुसार वॉशिंग मशिनचा अर्थच असा आहे की त्यांनी मागचा इतिहास सोडून भाजपची कार्यपद्धती अंगिकारली पाहिजे. त्याप्रमाणे जर भाजप करत असेल तर काय हरकत आहे. शेवटी लोकशाही पद्धतीच्या राजकारणात डोक्याला जितके महत्त्व आहे तितकेच महत्व त्या पक्षात डोके किती संख्येने जास्त आहेत ते पण तितकेच महत्वाचे आहेत. तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार विश्वासदर्शक ठरावात एका मताने पडले होते. त्यानंतर पंतप्रधान पदाच्या पदावर संगीत खुर्चीचा खेळ सुरू झाला होता. त्यामुळे देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये कोणी येत असेल आणि पक्षाची रचना व कार्यपद्धती अंगिकारत असेल तर काय हरकत आहे, अशी विचारणा टीकाकारांना सुनील केदार यांनी केली आहे.