सांगली : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील वादात सापडले आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्रातल्या मतदारसंघाचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरसोबत केली आहे. धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला, असं वादग्रस्त विधान हर्षवर्धन पाटील यांनी सांगलीच्या वाळवामध्ये केलं आहे.
advertisement
क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्या जयंती समारंभामध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे धैर्यशील माने निवडून आले होते. धैर्यशील मानेंचं विजयानिमित्त अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजीला थेट पाकव्याप्त काश्मीर म्हणून उपमा दिली, त्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.
'इचलकरंजीचा लोकसभा मतदारसंघ हा तसं पाहिलं तर पाकव्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे, कारण आजूबाजूला सगळी वादळं वेगळी होती. आजूबाजूला सगळ्या शक्ती, काही अदृष्य असतील काही प्रकट असतील, या सगळ्या शक्ती आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या वावटळामध्ये सुद्धा ज्याने दिवा लावला त्या धैर्यशील मानेंचं मी मनापासून अभिनंदन करतो', असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.