संबंधित व्हिडीओत भाजपचे काही पदाधिकारी मनसेच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करताना दिसून येत आहे. यात एका पदाधिकाऱ्याने मनसे पदाधिकाऱ्याच्या आईला देखील धक्का दिल्याचं व्हिडीओतून दिसून येत आहे. सतीश पाटील असे मारहाण झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तर, मारहाणीमध्ये सहभागी असणारे सर्व लोक हे भाजपचे स्थानिक पदाधिकारी असल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री मनसेचे पदाधिकारी सतीश पाटील यांना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली. उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या संदर्भात सतीश पाटील यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याच कारणावरून भाजप कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीदरम्यान सतीश पाटील यांच्या आई देखील उपस्थित होत्या.
माफी मागतानाचा Video व्हायरल
या प्रकरणानंतर मारेकऱ्यांनी सतीश पाटील यांनी उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांची जबरदस्तीने माफी मागायला लावली आहे. माफी मागतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उरणमध्ये मनसे देखील आक्रमक झाली आहे. आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पोलिसात तक्रार दाखल
या संपूर्ण प्रकरणानंतर मनसेचे पदाधिकारी सतीश पाटील यांनी उरण पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेबाबत अद्याप भाजप आमदार महेश बालदी यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अशाप्रकारे मारहाण करून माफी मागायला लावल्याने उरणमध्ये राजकीय तणाव वाढला आहे.
