नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवावर चिंतन करण्यासाठी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाली. 'देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची काहीच गरज नाही. ही एकट्याची नाही, तर सामूहिक जबाबदारी आहे पण दायित्व घेत ते पुढे आले', असं म्हणत पक्ष नेतृत्वाने फडणवीस यांचं कौतुक केलं.
advertisement
दिल्लीमध्ये केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपची महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला भाजप अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित आहेत. पक्षांतर्गत बदलाच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा सुरू असून सोबतच संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाच्या रणनीतीच्या संदर्भात देखील बैठकीत चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्रातील पराभवावरही चर्चा झाली.
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे, पण राजीनामा देण्याची काहीच गरज नाही. ही एकट्याची नाही, तर सामूहिक जबाबदारी आहे पण दायित्व घेत ते पुढे आले. दोन पक्ष सोबत घेत सरकार चालवण्याचं कसब फडणवीस यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ विधानसभा निवडणुकीचे नियोजन करावे आणि त्या प्लॅनवर 22 तारखेला पक्षातील अन्य नेत्यांशी सल्लामसलत करावी, त्यामुळे 22 तारखेला पुन्हा कोअर कमिटीची बैठक मुंबईत होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर, नवीन प्रभारींना या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे.
अन्य नेते निष्क्रिय राहून चालणार नाही. फडणवीस काम करतात, म्हणजे महाराष्ट्र ही काही त्यांची एकट्याची जबाबदारी नाही, त्यात अन्य नेत्यांनी आपले प्रयत्न वाढवले तर महाराष्ट्रात विधानसभा जिंकण्यापासून आपल्याला कुणीही थांबवू शकणार नाही, असं मत व्यक्त करत केंद्रीय नेतृत्वाने या विधानातून इतर नेत्यांना संदेश दिला आहे.
शिंदे, अजित पवार यांच्यासोबत जागावाटप फॉर्म्युला लगेच निश्चित करा आणि रणनीतीचे बारकाईने नियोजन करा, असे निर्देशही फडणवीसांना केंद्रीय नेतृत्वाने दिले आहे. दिल्लीत श्रेष्ठींसोबत आगामी काळात आणखी काही बैठकी होणार आहेत, हेही यामुळे निश्चित मानले जात आहे.