मुंबई : नवी मुंबई हे सध्या राजकीय संघर्षांचं मोठं केंद्र ठरत आहे. महायुतीतच येथे ठिणगी पडली असून वनमंत्री गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटात विस्तवही जात नसल्याचे दिसत आहे. दोन्ही गटातील वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहे. आता नवी मुंबई महापालिकेत १४ गावांचा समावेशावरून भाजप आमदारांमध्ये जुंपली आहे. या १४ गावांच्या समावेशावरून मंदा म्हात्रे - गणेश नाईक पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे.
advertisement
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील १४ गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठविलं आहे. कोणत्याही परिस्थितीत 14 गावांना महापालिका हद्दीत राहू देणार नाही असे वक्तव्य गणेश नाईकांनी केले आहे. तर दुसरीकडे मंदा म्हात्रे यांची मात्र गावांना हद्दीत समाविष्ट करण्यासंदर्भात सकारात्मक आहेत. त्यामुळे आता भाजपच्या दोन नेत्यांमध्ये नवी मुंबई महापालिकेवरून नव्यानं ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
निवडणुकीनंतर पुढील 6 महिन्यात गावं बाहेर काढणार : गणेश नाईक
आम्हाला ती 14 गावं आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत नको. नवी मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक झाल्यानंतर ही सर्व गाव आपण बाहेर काढू. निश्चित सर्व गाव बाहेर निघतील, असा दावा त्यांनी छातीठोकपणे केला. निवडणुकीनंतर पुढील 6 महिन्यात ही गावं बाहेर काढण्यात येतील असे ते म्हणाले. कुणाच्यातरी लहरीपणामुळे झालेल्या गोष्टी आणि त्याचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू असा सवाल वनमंत्री गणेश नाईक यांनी केला.
कोणती आहेत ही १४ गावे?
नावाळी, वाकळण, बाम्मली,दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू,नारीवली, भंडार्ली, उत्तर शीव, बाळे, नागांव, गोठेघर अशी गावांची नावे आहेत.
त्यामुळे 14 गावांच्या समावेशावरून पुन्हा एकदा नाईक आणि म्हात्रे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय.. त्यामुळे आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकी तोंडावर नवीमुंबईमधलं राजकीय वातावरण तापलंय.