भाजपकडून दोन टप्प्यात हे पक्ष प्रवेश होणार आहेत. पहिला टप्प्यात उद्या भाजपमध्ये अनेकांचे प्रवेश होणार आहेत, तर पुढच्या पक्ष प्रवेशाची तारीख भाजपकडून लवकरच जाहीर होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठाराचे पुत्र सुरेंद्र पठारे, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विकास नाना दांगट आणि दिवंगत मनसे आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे यांचाही भाजपात प्रवेश होणार आहे. याशिवाय माजी नगरसेवक बाळा धनकवडे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील २२ माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे.
advertisement
रमेश वांजळे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या मृत्यूनंतरही वांजळे कुटुंब कायम मनसेत राहून काम करत होतं. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर रमेश वांजळे यांची लेक सायली वांजळे भाजपात प्रवेश करत आहेत. याशिवाय भाजपनं इतर पक्षांना देखील धक्के दिले आहेत.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप कार्यालयात रविवारी सकाळी साडेदहा वाजता हा प्रवेश होणार असून, पुण्यातील भाजपचे नेतेही या वेळी उपस्थित राहणार आहेत. या पक्ष प्रवेशांमुळे खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर परिसरात भाजपची ताकद वाढणार आहे.
