अजित पवार यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व आणि नेतृत्वाचा प्रश्न उभा ठाकलेला असताना आणि पक्षातूनही बरेच मतप्रवाह समोर येत असताना सुनेत्रा पवार यांनी धीटपणे समोर येऊन उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यास होकार दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून अजित पवार यांच्याकडील खाती पक्षाकडेच ठेवण्यात यावी, अशी विनंती केली होती. मात्र अर्थखात्यासंदर्भात राष्ट्रवादीची अट भारतीय जनता पक्षाला मान्य नसल्याचे समजते.
advertisement
अर्थखाते राष्ट्रवादीला देण्यास भाजपचा नकार, सूत्रांची माहिती
सरकारमधील ज्या पक्षाकडे अर्थखाते असते, तो पक्ष व्यवस्थित वेग पकडतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार आणि महायुतीच्या सरकारमध्ये हट्टाने अर्थखाते आपल्याकडे मागून घेतले. भाजपच्या साथीला जाताना अर्थखाते आणि पुण्याचे पालकमंत्रिपद घेऊनच त्यांनी सरकारमध्ये प्रवेशासंदर्भात निर्णय घेतले. मात्र आता अजित पवार यांच्या माघारीनंतर अर्थखाते राष्ट्रवादीकडे न ठेवता भाजप ते आपल्याकडे घेणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
अर्थसंकल्प कोण मांडणार? फडणवीस म्हणाले, मीच प्रक्रिया पूर्ण करणार
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? असा प्रश्न विचारला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे या प्रश्नाचे उत्तर दिले. अजित पवार यांनी अर्थसंकल्पाचे बरेचसे काम केले होते. उर्वरित कामात मी जातीने लक्ष घालून प्रक्रिया पूर्ण करेल, असे म्हणत अर्थसंकल्प स्वत: मांडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्याचवेळी अर्थखातेही आपल्याकडेच ठेवणार असल्याचे सूचक संकेत त्यांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
