मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आलेले काही नगरसेवक हे नॉट रिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असल्यामुळे विरोधी बाकांवर बसण्याची मानसिकता नसलेले ठाकरे गटाचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय.
शिवसेनेचे 'ॲापरेशन टायगर' सक्रिय?
शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. तसेच इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्याकडे आणण्यासाठी शिवसेनेचे 'ॲापरेशन टायगर' सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळेच ठाकरे गटाचे काही नगरसेवक नॅाट रिचेबल असून ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर व्हावा अशी शिवसैनिकांची आग्रही मागणी
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले तरी शिवसेनेच्या समर्धनाशिवाय त्यांची सत्ता येणे अशक्य आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेनेची वाटाघाटीची शक्ती (बार्गेनिंग पॉवर) बरीचशी वाढली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला मुंबईकरांनी स्पष्ट बहुमत दिलंय. गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर सातत्याने शिवसेनेचा महापौर विराजमान झालाय. यंदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा महापौर असावा, अशी आग्रही मागणी शिवसैनिक करतायेत. भाजपनेही त्यांचे जास्त नगरसेवक निवडून आले तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली म्हणून शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर बसवावा, अशी मागणी शिवसैनिकांमधून होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर कानावर टाकल्या आहेत.
