संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगर पालिकेत ठाकरे बंधू आणि महायुतीत निकराची लढाई सुरू आहे. सुरुवातीला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असे चित्र होते. मात्र त्यानंतर ठाकरे बंधूंचे आकडे हळूहळू वाढायला लागले. तसेच काँग्रेस पक्षानेही २० पेक्षा अधिक जागा जिंकून किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचे दाखवून दिले. हे सारे चित्र पाहून महायुतीतील भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने मुंबईचे महापौरपद आम्हाला हवे आहे, अशी प्रतिक्रिया दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
advertisement
बृहन्मुंबई निकालाची मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरू झाली. पहिल्या कलांपासूनच ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष होता. दुपारपर्यंत चित्र पालटले. महायुतीची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. परंतु शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील निकाल दुपारी चार नंतर यायला लागले. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आकडा वाढला. काँग्रेस पक्षानेही २२ पेक्षा अधिक नगरसेवक जिंकून आपली ताकद दाखवून दिली. आश्चर्यकारक म्हणजे एमआयएमने मुंबई शहरात आठ नगरसेवक निवडून आणले आहेत. या आकड्यांनी मुंबईच्या निकालात ट्विस्ट आलेला असताना एकनाथ शिंदे यांनी महापौरपदाची मागणी करून भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.
एकनाथ शिंदे काय म्हणाले...?
मुंबईकर, ठाणेकरांना आणि राज्यातील सर्व मतदारांना धन्यवाद देतो आणि आभारही मानतो. ठाण्यात 71 जागांवर विजय आणि 4 जागी आघाडीवर आहोत. गेल्यावेळी 67 जागा जिंकल्या होत्या. ठाण्यात आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले. ठाणेकरांचे अभिनंदन आणि धन्यवाद. मुंबईत देखील आम्ही बहुमताच्या जवळ आलो आहोत. राज्यातील वातावरण महायुतीच्या बाजूने राहिले. MMDRAमध्ये महायुतीला यश मिळाले. मुंबईत 'महायुतीचा महापौर होईल', असे सूचकपणे सांगत मुंबईत भाजपचा महापौर होईल, असे म्हणणे एकनाथ शिंदे यांनी जाणुन बुजून टाळले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ही निवडणूक विकासाच्या आधारावर लढवली. काही जणांनी भावनेच्या आधारावर निवडणूक लढले. गेल्या साडे तीन वर्षात आम्ही मुंबईत केलेल्या कामावर लोकांनी मते दिली. त्यांनी अनेक प्रकल्प थांबवले होते, त्याला आम्ही चालना दिली. २५ वर्ष ज्यांनी पालिकेत सत्ता चालवली त्या विरोधात लोकांनी मतदान केले. मुंबईत सत्ता महायुतीला मिळाली. लोकांनी विकासाला मतदान दिले.
