मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगेंच्या नेतृत्वात आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू झाले आहे. आज उपोषण आंदोलनाचा चौथा दिवस आहे. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. मागील 3 दिवसांत मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांच्या प्रचंड संख्येमुळे मुंबई सीएसएमटी, मुंबई महापालिका परिसरात वाहतूक कोंडी झाली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. आज हायकोर्टात या आंदोलना विरोधात तातडीने सुनावणी झाली.
advertisement
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलनाला देण्यात आलेली परवानगी रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत रहदारीचा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे त्यांनी म्हटले.सीएसएमटी हा महत्त्वाचा परिसर आहे. दुसरीकडे महाअधिवक्त्यांनी सरकारची बाजू मांडताना महत्त्वाची माहिती कोर्टाला दिली.
महाअधिवक्ते वीरेंद्र सराफ यांनी सांगितले की, आमरण उपोषणाला सरकार परवानगी देत नाही. आता त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांना आंदोलनासाठीच्या अटी-शर्तीचे उल्लंघन झाले आहे. जरांगे यांनी आपण अटी-शर्तीचं पालन करू असे म्हटले होते. मात्र, तसे झाले नाही. शनिवार-रविवारी करण्यात आलेले आंदोलन हे परवानगीशिवाय झालं असल्याची माहिती महाधिवक्त्यांनी दिली.
अंमलबजावणीचे काम तुमचे...
हायकोर्टात सुनावणी सुरू असताना मराठा आंदोलकांच्या घोषणांचे आवाज कोर्ट रुममध्ये ऐकू आले. यावर खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. उच्च न्यायालयाने टाइम्स ऑफ इंडियाची बातमीची दखल घेणार असल्याचे स्पष्ट केले. संपूर्ण उच्च न्यायालय परिसराला मराठा आंदोलकांचा वेढा आहे का? असा प्रश्न न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी सरकार आणि याचिकाकर्त्यांना केला. यावेळी हायकोर्टाने नियमांचे उल्लंघन आणि कारवाईबाबत टिप्पणी केली. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले, अंमलबजावणीचे काम तुमचे असल्याचे कोर्टाने म्हटले.