बुलढाणा : पती-पत्नीच्या वादात निष्पाप बाळांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीशी झालेल्या वादानंतर रागाच्या भरात आपल्याच बापाने आपल्या दोन मुलींचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर त्या क्रूर बापाने आपल्या मुलींचा खून करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून थेट पोलीस स्टेशन गाठले आणि माझ्या दोन मुलींचा खून केल्याची कबुली दिली. अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीचे नाव राहुल चव्हाण आहे. पतीचे पत्नीशी काही दिवसांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू होते. या वादाचे रूपांतर एवढे वाढले की, रागाच्या भरात आरोपीने आपल्या 7 आणि 9 वर्षांच्या दोन निष्पाप मुलींचा गळा आवळून खून केला. इतकंच नव्हे, तर मृतदेह लपविण्यासाठी त्याने त्यांना अनचरवाडी शिवारातील जंगलात नेऊन टाकले. त्यानंतर तो थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि शांतपणे मुलींचा खून केल्याची कबुली दिली.
नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जंगलात दोन्ही चिमुकल्या मुलींचे कुजलेले मृतदेह आढळले. प्राथमिक पंचनामा आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात कमालीची खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे. पत्नीशी झालेल्या वादातून रागाच्या भरात दोन निष्पाप जीवांचा अंत केल्याची ही घटना समाजमनाला हादरवून सोडणारी आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. कौटुंबिक वादाचे रूपांतर इतके भीषण होते की यामध्ये दोन निष्पाप जीव गेले.
