नांदेड : नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या सभेत घोषणाबाजी करण्यात आली होती . गोंधळ घालणाऱ्या आठ जणांवर उमरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. कैलास सुर्यवंशी यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांचे भाषण सुरू असताना या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता.
advertisement
शिरीष देशमुख गोरठेकर आणि कैलास देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली दीड हजार कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशाला अजित पवार उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी घोषणा दिल्या. शेतकऱ्यांच्या घोषणाबाजीमुळे अजित पवार यांना काही वेळ भाषण थांबवावे लागले. सभास्थळी गोंधळ उडाल्यानंतर कर्जमाफी होणार नाही असे मी कधीच म्हटले नाही, अशी सारवासारव अजित पवार यांनी केली होती.
आठ जणांवर गुन्हा दाखल
कर्जमाफी कधी करणार ते सांगा... अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अजित पवार यांना कोंडीत पकडले. त्यावर कर्जमाफी करणार नाही, असे मी म्हणालोच नाही, असे अजित पवार म्हणाले होते. मात्र शेतकरी घोषणा देत असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत दोन शेतकऱ्यांना ताब्यात घेतले होते त्यानंतर आता आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी, सुविधा आणि संसाधनं उपलब्ध करून देणं ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. अप्पर पैनगंगा कालव्याचं उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी खात्री दिली. त्याचबरोबर तरुण शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रगतशील शेतीचं प्रशिक्षण दिलं जाईल, जेणेकरून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग मोकळा होईल. आज पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला आहे. नवीन कार्यकर्त्यांनाही तितक्याच सन्मानानं स्थान दिलं जाईल, वागवलं जाईल. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
