FASTag संदर्भातील नियमात काय बदल?
आतापर्यंत FASTag अॅक्टिव्ह करताना Know Your Vehicle (KYV) ही अनिवार्य प्रक्रिया होती. या प्रक्रियेत वाहनाची माहिती, नोंदणी क्रमांक, वाहनाचा प्रकार आणि इतर तपशीलांची पडताळणी केली जात होती. मात्र १ फेब्रुवारी २०२६ पासून कार, जीप आणि व्हॅनसाठी KYV व्हेरिफिकेशन प्रक्रिया रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे FASTag वापरणे अधिक सोपे, जलद आणि त्रासमुक्त होणार आहे.
advertisement
बँकांकडे सोपवली जबाबदारी
नवीन नियमांनुसार FASTag संदर्भातील वाहन माहितीची पडताळणी करण्याची संपूर्ण जबाबदारी आता थेट बँकांकडे देण्यात आली आहे. FASTag जारी करणाऱ्या बँका वाहनाच्या अधिकृत डेटाबेसच्या आधारे आवश्यक तपासणी करतील. त्यामुळे वाहनधारकांना वेगवेगळ्या टप्प्यांवर पुन्हा-पुन्हा व्हेरिफिकेशन करण्याची गरज भासणार नाही. टॅग घेतल्यानंतर तो त्वरित अॅक्टिव्ह होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
नियम बदलण्यामागचे कारण काय?
Know Your Vehicle (KYV) ही प्रक्रिया चुकीचा किंवा ड्युप्लिकेट FASTag वापर रोखण्यासाठी लागू करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अनेक वेळा तांत्रिक अडचणी, डेटाबेस अपडेट न होणे किंवा सर्व्हर डाऊन असणे अशा कारणांमुळे ही प्रक्रिया वेळखाऊ ठरत होती. यामुळे FASTag अॅक्टिव्हेशनला उशीर लागत होता आणि वाहनचालकांना टोल प्लाझावर अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागत होता.
याशिवाय बँकांच्या शाखा आणि कस्टमर केअर सेंटरच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. या सर्व बाबींचा विचार करून NHAI ने KYV प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहनचालकांना नेमका काय फायदा?
या नव्या नियमामुळे FASTag वापरकर्त्यांना अनेक पातळ्यांवर दिलासा मिळणार आहे. FASTag घेण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. टॅग खरेदी केल्यानंतर तो लगेच वापरता येणार असल्याने प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही. कागदपत्रांची तपासणी, अपलोड आणि व्हेरिफिकेशनचा त्रास कमी होणार आहे.
टोल प्लाझावर होणारे वाद कमी होणार
FASTag अॅक्टिव्ह नसल्यामुळे किंवा व्हेरिफिकेशन अपूर्ण असल्यामुळे टोल प्लाझावर अनेकदा वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होत होते. नव्या नियमामुळे अशा प्रकारचे गैरसमज आणि वाद कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी टोल प्लाझावर वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि वेळेची बचत होईल.
