भररस्त्यात सिलेंडर्सची अफरातफर
मिळालेल्या माहितीनुसार, HPCL कंपनीच्या गेटसमोर गॅस सिलिंडर भरण्यासाठी ट्रक्सची मोठी रांग लागलेली असते. याच रांगेत उभ्या असलेल्या एका ट्रकमधून काही तरुण सिलेंडर्स बाहेर काढताना आढळून आले. हे तरुण ट्रकमधून काढलेले सिलेंडर्स घेऊन घटनास्थळावरून पळून गेले. हा संपूर्ण प्रकार स्थानिक नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
advertisement
प्रशासनाच्या नाकाखाली काळाबाजार
ज्या ठिकाणी गॅसचा अधिकृत पुरवठा होणे अपेक्षित आहे, त्याच कंपनीच्या गेटवर चालकांकडून आणि काही टोळ्यांकडून हा काळाबाजार सुरू असल्याने खळबळ माजली आहे. एकीकडे गॅसअभावी अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत, तर दुसरीकडे अशा प्रकारे उघडपणे होणारी चोरी पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
जबाबदार कोण?
कंपनीच्या गेटवरच हा प्रकार घडत असल्याने HPCL प्रशासनाच्या सुरक्षेवर आणि देखरेखीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या काळाबाजारामुळे सर्वसामान्यांना मिळणाऱ्या गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे म्हटले जात आहे. आता पोलीस आणि प्रशासन या टोळीवर तसेच संबंधित ट्रक चालकांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
