शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीडच्या दौऱ्यावर आहे. शेतकरी संवाद मेळाव्याच्या निमित्ताने बीडच्या पाली गावात आले होते. मेळावा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह मिलिंद नार्वेकर, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि इतर नेते स्टेजवरून खाली उतरले.
पण तिथून जात असताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. अचानक झालेल्या गर्दीमुळे चंद्रकांत खैरे यांना धक्का लागला आणि त्यांचा तोल गेला, खाली पडणार तेच अंबादास दानवे आणि कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं. हा सगळा प्रकार उद्धव ठाकरे यांच्यासमोर घडला.
advertisement
चंद्रकांत खैरे यांनी स्वत: ला सावरलं. त्यानंतर त्यांनी धक्का देणाऱ्या पदाधिकाऱ्याला पकडलं. धक्का देणाऱ्या पदाधिकाऱ्याला मोठ्याने ढकलून देत खैरे यांनी राग व्यक्त केला. यावेळी चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख यांच्यात बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. धक्का लागल्याने चंद्रकांत खैरे कमालीचे संतापले होते. त्यांनी पदाधिकाऱ्याला चांगलंच फैलावर घेतलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या बीडमधील शेतकरी संवाद मेळाव्याला शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं पाहण्यास मिळालं. मेळाव्याच्या ठिकाणी फक्त कार्यकर्त्यांचीच गर्दी पाहायला मिळाली. यामुळे नेमका शेतकऱ्यांचा संवाद होता की कार्यकर्ता मेळावा याची चर्चा होत आहे. बीडच्या पाली गावात आज शिवसेनेच्या वतीने शेतकरी संवाद मेळाव्याच्या आयोजन करण्यात आलं होतं. अतिवृष्टीचे पॅकेज शेतकऱ्यांना मिळाले का नाही यासंदर्भात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार होते. या मेळाव्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली चक्क महिला पदाधिकारी आणि कार्यकर्तेच या मेळाव्यासाठी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे मेळाव्याच्या ठिकाणी येण्याअगोदर अंबादास दानवे यांनी 'लोकांचे पहा' अशा सूचना केल्या यावेळी गावातील लोकांनी तुमच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील लोकांना सांगितलेच नाही, असंही उत्तर दिलं. यामुळे उद्धव ठाकरे येण्याअगोदर पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.