पोलिसांनी आरोपींपैकी एकाला ताब्यात घेतले असून सध्या सौरभ ठोंबरेसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडुर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंद करण्यात आलाय.
पोलिसात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याप्रमाणे काल संध्याकाळी हे सर्व नगरसेवक पुण्यावरून नागपूरसाठी निघाले होते. आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर गणेशपुर शिवार येथे सहा गाड्यांमधून आलेल्या या दहा ते पंधरा लोकांनी फिर्यादीची ट्रॅव्हल थांबवली. त्यानंतर आरोपींनी या नगरसेवकांना शिवीगाळ करत आपल्या सोबत राजकारण करण्याची आणि सोबत न आल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
advertisement
दोन्ही गटामध्ये झालेल्या वादानंतर फिर्यादी पक्षाने आरोपी पक्षातील एकाला पकडून ठेवले आणि इतर सर्व आरोपी पळून गेले. वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी पकडून ठेवलेल्या कनैन सिद्दीकी (खापरखेडा, नागपूर जिल्हा) याला ताब्यात घेतले आहे. दुपारी उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया झाल्यानंतर वडेट्टीवार गटाचे सर्व नगरसेवक नागपूरकडे रवाना झाल्याची माहिती आहे.
