नागपुरातील कोराडी मंदिराजवळ प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू असताना शनिवारी स्लॅब कोसळला. कोराडी ते मंदिर मार्गावरील गेटचे निर्माण कार्य सुरू आहे. मंदिराच्या गेट क्रमांक चार जवळ स्लॅबचे काम सुरू होते. स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक बांधकामाचा काही भाग कोसळला. ही घटना कशी घडली याची चौकशी करण्यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांनी समितीची स्थापना केली आहे.
advertisement
बावनकुळेंनी जिल्हाधिकारी डॉ. ईटनकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली
या समितीत नागपूर मनपा आयुक्त, कार्यकारी संचालक जलसंपदा विभाग नागपूर, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, तसेच संचालक व्हीएनआय टी नागपूर यांचा समावेश आहे. या चौकशी समितीने कोराडी मंदिर परिसरात नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तर्फे प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत संबंधी विभाग कंत्राटदार यांनी केलेल्या सुरक्षेच्या दुर्लक्षतेमुळे झालेल्या दुर्घटनेबाबत तातडीने चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी व कंत्रादारावर योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या चौकशी समितीने तीस दिवसांच्या आतमध्ये अहवाल सादर करावा, असे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले आहेत.
कोराडी मंदिराजवळ दुर्घटना कशी घडली?
कोराडी मंदिराजवळ प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू असताना कोसळलेल्या स्लॅबमुळे जवळपास १७ श्रमिक जखमी झाले. यापैकी दोन ते तीन जण गंभीर होते. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील जखमींना नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करू, असे सांगितले आहे.
