स्वातंत्र्यलढ्यातील पहिल्या सशस्त्र कारवाईचा साक्षीदार
पिंपरी-चिंचवडमधील चाफेकर चौक हा फक्त वाहतुकीचा रस्ता नाही, तर आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची आठवण आहे. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. त्या वेळी ब्रिटिश अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड याने नागरिकांवर खूप कठोर आणि त्रासदायक नियम लादले होते. याचा विरोध करण्यासाठी दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली. ही घटना स्वातंत्र्यलढ्यातील पहिली मोठी सशस्त्र कारवाई ठरली. त्यांच्या शौर्याची आठवण जपण्यासाठी या चौकाला 'चाफेकर चौक' नाव देण्यात आलं.
advertisement
Independence Day: राज्यातील 15 सरपंचांना विशेष मान, लाल किल्ल्यावर मिळालं आमंत्रण
चाफेकर बंधूंचा अन्यायाविरुद्ध लढा
पुण्यात प्लेगची भीषण साथ पसरली होती. रोगनियंत्रणाच्या नावाखाली ब्रिटिश अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँडने लोकांवर अमानुष नियम लादले. त्याने अनेकांची घरं जाळली, धार्मिक स्थळांचा अपमान केला, महिलांशी गैरवर्तन केलं आणि पुरुषांना अपमानास्पद वागणूक दिली. या घटनांनी दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या चाफेकर बंधूंच्या मनात क्रांतीची ज्वाला पेटवली. त्यांनी रँडच्या अत्याचारांचा बदला घेण्याचा निश्चय केला. लोकमान्य टिळकांच्या केसरीतील लेखांनी चाफेकर बंधूंचा निश्चिय अधिक दृढ केला, अशी माहिती गिरीश प्रभुणे यांनी दिली.
गणेशखिंड येथील सशस्त्र कारवाई
व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव 22 जून 1897 रोजी पुण्यात साजरा होणार होता. मेजवानी संपल्यानंतर मध्यरात्री गणेशखिंड येथे रँड बाहेर पडताच दामोदर यांनी त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. बाळकृष्ण यांनी लेफ्टनंट आयरिस्टला गोळी घातली. ही घटना स्वातंत्र्यलढ्यातील पहिली मोठी सशस्त्र कारवाई ठरली.
अटक आणि मृत्यूदंड
मोठ्या अधिकाऱ्याच्या हत्येनंतर ब्रिटिश सरकार हादरलं. अनेक दिवस मारेकऱ्यांचा पत्ता लागत नव्हता. मात्र, द्रविड बंधूंनी पैशांच्या मोहापोटी चाफेकर बंधूंची माहिती ब्रिटिशांना दिली. यानंतर वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंची हत्या केली. दामोदर चाफेकर यांना 18 एप्रिल 1898 रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. वासुदेव चाफेकर यांना 8 मे 1899 रोजी, तर बाळकृष्ण चाफेकर यांना 16 मे 1899 रोजी फाशी देण्यात आली.
चाफेकर चौकातील स्मारक
1971 मध्ये चिंचवड येथील चाफेकर चौकात दामोदर चाफेकर यांचा पुतळा बसवण्यात आला. 2010 मध्ये रस्ता रुंदीकरणानंतर नवीन आराखड्यात दामोदर आणि बाळकृष्ण यांचे 12 फूट उंच उभे पुतळे, तसेच वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांचे 7 फूट बसलेले पुतळे उभारले गेले. आज हा चौक फक्त वाहतुकीचा मार्ग नसून, शौर्य आणि बलिदानाचा जिवंत पुरावा आहे.