या अपघातात किशोर छबुलाल सोनवणे वय 37, रा. रायपूर-डोणगाव, ता. गंगापूर, सध्या राहणार कागजीपुरा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांचा दीड वर्षांचा मुलगा शिवा याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याचीही प्राणज्योत मालवली. पत्नी पूजा सोनवणे (वय 27) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर सोनवणे हे पत्नी आणि लहानग्या मुलासह खुलताबादच्या आठवडी बाजारासाठी दुचाकीवरून निघाले होते. कुटुंबासोबतचा तो साधा प्रवास क्षणार्धात काळरात्रीत बदलला. एमएच 21 बीएच 4338 क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली आणि सगळं काही संपलं.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही बाप-लेकाला वाचवता आले नाही. घटनेची माहिती मिळताच बीट जमादार किशोर गवळी, जाकीर शेख, सिद्धार्थ सदावर्ते तसेच गृहरक्षक दलाचे जवान महेश तुपे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातानंतर ट्रक चालक वाहन जागीच सोडून फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
एक साधा दिवस, एक साधा प्रवास… पण नियतीने एका कुटुंबाचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. बाप-लेकाच्या निधनाने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.






