गेल्या 9 वर्षांपासून अनंत मोताळे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या चळवळीने गणेशोत्सवात एक नवा आदर्श निर्माण केला. 900 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी भंडाऱ्यांचे आयोजन केले आणि त्याच अन्नाचे योग्य नियोजन रोटी बँकच्या मदतीने करण्यात आले. संचालक युसूफ मुकाती यांच्या नेतृत्वाखाली उरलेले अन्न जमा करून गरजूंना पुरवले गेले.
advertisement
रेल्वे स्थानक, घाटी रुग्णालय परिसर, उड्डाणपुलाखाली वास्तव्यास असलेले लोक हे सर्व या उपक्रमाचे लाभार्थी ठरले. विशेष म्हणजे, या चळवळीमुळे तीन टन कचऱ्याची निर्मितीही टळली. पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर संगम इथे पाहायला मिळाला.
गेल्या वर्षी ‘अन्न वाचवा समिती’ने 9 हजार लोकांपर्यंत अन्न पोहोचवले होते, यंदा ती संख्या 13 हजारांवर पोहोचली. म्हणजेच केवळ आकड्यांची वाढ नाही, तर जनजागृतीचाही विस्तार झाला आहे. पोलिस उपायुक्त संपत शिंदे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
अनंत मोताळे यांना एका विवाहसोहळ्यानंतर अन्नाचा अपमान आणि गरिबांची भूक दिसली आणि त्यातून ‘अन्न वाचवा’ चळवळीचा उगम झाला. आज या संकल्पनेने हजारोंच्या पोटात अन्न आणि समाजाच्या मनात माणुसकीचा शिडकावा केला आहे.