कमलगिरी महाराज हे श्री कमलगिरी मठ देवस्थान विश्वस्त मंडळाचे सदस्य होते. जटवाडा रोडवरील हरिओमनगर येथील प्लॉट क्रमांक 28 मध्ये त्यांचा मठ असून ते आयुर्वेद, साधना आणि समाजसेवेसाठी ओळखले जात होते. या घटनेमुळे हरिओमनगरसह, केळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकं घडलं काय अन् कसं?
गुरुवारी सकाळी सुमारे आठच्या सुमारास महाराज सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील श्री क्षेत्र मुर्डेश्वरपासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावरील मुर्डेश्वर डोंगरावर गेले होते. डोंगराळ भागात काही दुर्मिळ वनौषधी शोधत असताना अचानक पाय घसरला आणि ते थेट सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळले.
advertisement
सतत रक्तस्राव अन् पोटात गोळा, डॉक्टरांनी महिलेला तपासलं अन् गर्भपिशवीत भयंकर दिसलं
या अपघातात त्यांच्या हात-पायांसह संपूर्ण शरीराला गंभीर दुखापत झाली होती. ते पूर्णपणे रक्तबंबाळ अवस्थेत दरीत पडले होते. अपघाताची माहिती मिळताच परिसरात ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. मात्र, दरीचा भाग अत्यंत दुर्गम, काटेरी झुडपांनी भरलेला आणि अवघड असल्याने बचाव कार्य तत्काळ सुरू होऊ शकले नाही.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत मुर्डेश्वर येथील एकनाथ कोठाळे, समाधान कोठाळे आणि सीताराम इवरे हे मदतीसाठी पुढे आले आणि दरीत उतरून महाराजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महाराज अत्यंत जखमी अवस्थेत असले तरी शुद्धीत होते. बराच वेळ दरीत अडकून राहिलेल्या महाराजांनी जवळपास दोन लिटर पाणी प्यायले होते. मात्र, शरीरावर झालेला जबर मार आणि रक्तस्राव त्यांच्या जीवावर बेतत होता.
महाराजांना बाहेर काढण्यासाठी 7 तासांचा संघर्ष
महाराजांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी दरीतून सुमारे दोनशे फूट लांबीचा मार्ग तयार केला. हा मार्ग अतिशय धोकादायक आणि खडतर होता. सकाळी 9 वाजता घडलेला अपघात आणि दुपारी 5 वाजता महाराजांना बाहेर काढण्यात आले. तब्बल सात तासांचा हा संघर्ष ग्रामस्थांसाठीही आव्हानात्मक ठरला.
शेवटचा संवाद आणि मालवली प्राणज्योत
दरीतून अडकलेल्या अवस्थेतही कमलगिरी महाराजांनी पत्नी आणि मुलगा वैभव यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला होता. मात्र, डोंगराळ व दुर्गम भागामुळे मुलाला घटनास्थळी पोहोचण्यास दुपारचे 4 वाजले. अखेर महाराजांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून सिल्लोड येथील रुग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कमलगिरी महाराजांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.






