मिळालेल्या माहितीनुसार, काजल आणि अमोल यांचा विवाह 25 मार्च 2025 रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नाच्या दिवशी स्वतः मृदंग वाजवत अमोलने मंडपात केलेला प्रवेश सोशल मीडियावर प्रचंड गाजला होता. सुरुवातीचे काही महिने त्यांचा संसार अगदी सुरेल वाटावा असा होता. पण काळ जसजसा पुढे सरकला, तसतसा या नात्यातील सूर विस्कटू लागला आणि आनंदी आयुष्याला दु:खाची छाया पडू लागली.
advertisement
पत्नीला संशय
काजलच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, अमोलचे दुसऱ्या एका महिलेशी संबंध असल्याचा संशय काजलला होता. पत्नी म्हणून तिने याबाबत विचारणा केली असता, तिच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी अमोलने संतापाचा मार्ग निवडला. तिला मारहाण करणे, मानसिक छळ करणे आणि "माझ्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप केलास तर घराबाहेर काढीन" अशा धमक्या देणे, हे तिच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनले होते. अवघ्या नऊ महिन्यांच्या संसारात काजलने सहन केलेला मानसिक ताण आणि वेदना तिच्यासाठी असह्य ठरल्या.
लोका सांगे ब्रह्मज्ञान...
दरम्यान, अमोल लघाणे हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून, त्याच्या प्रबोधनपर व्हिडिओंमुळे लोक त्याला आदर्श मानत होते. मात्र, ज्या व्यक्तीने समाजाला नीतीमूल्यांचे धडे दिले, त्याच्यावरच अशा प्रकारचे आरोप झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. काजलने आपल्या संसारासाठी शेवटपर्यंत झगडण्याचा प्रयत्न केला, पण पतीच्या वागणुकीमुळे तिची स्वप्नेच कोसळली.
वेदनादायक शेवट
1 एप्रिल रोजी या संघर्षाचा शेवट अत्यंत वेदनादायक झाला. काजलने आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती समोर आली. तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अमोल लघाणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहेत.






