नेमकं घडलं काय?
हर्सूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत गजानन महाराज मंदिर असून तिथे सप्ताहाचा कार्यक्रम सुरू होता. एक तरुणी अचानक तेथे आली आणि जोरजोरात आरडाओरड करू लागली. उपस्थितांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला ताब्यात घेत शासकीय रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी ती मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी तिला माणुसकी वृद्ध सेवालयात दाखल केले.
advertisement
Online Gaming: पैशासाठी ऑनलाईन गेम खेळताय? संभाजीनगरच्या महिलेसोबत भयंकर घडलं, थेट रुग्णालयात
माणुसकी वृद्ध सेवालयाच्या संचालिका पूजा पंडित यांनी संयमाने आणि आपुलकीने तरुणीशी संवाद साधला. विश्वास वाढल्यानंतर तरुणीने आपली व्यथा सांगितली. तिने स्वतःचे नाव सांगण्यास नकार दिला, मात्र आपण जालन्याची असल्याचे सांगितले. गेल्या सहा वर्षांपासून आपण रस्त्यावर भटकत असून अनेकांनी फसवणूक केली, लग्नाचे आमिष दाखवून सोडून दिले, अशी हृदयद्रावक आपबिती तिने कथन केली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माणुसकी समूहाने सोशल मीडियावर तिच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. याच दरम्यान माणुसकी समूहाचे स्नेही आणि दौलताबाद पोलिस उपनिरीक्षक वसंतराव शेळके यांच्या मदतीने या प्रयत्नांना दिशा मिळाली. तपासादरम्यान तरुणीची मोठी बहीण मुंबईत राहत असल्याची माहिती मिळाली. संपर्क साधल्यानंतर बहिणीने तरुणीची ओळख पटवली आणि माणुसकी समूहाला याबाबत खात्री दिली.
यानंतर माणुसकी समूहाचे सुमित पंडित यांनी ही माहिती हर्सूल पोलिस ठाण्याला दिली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नातेवाईकांना माणुसकी वृद्ध सेवालयात बोलावण्यात आले. अखेर सहा वर्षांनंतर तरुणीची ओळख अधिकृतपणे पटली आणि तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
आता मी कुठेही जाणार नाही...
या भेटीवेळी तरुणीच्या आईने भावूक होत सांगितले की, “सहा वर्षांपासून आम्ही तिचा शोध घेत होतो. ती कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली होती. तिच्या जाण्यानंतर तिच्या वडिलांचे निधन झाले. एक मुलगा सैन्यात कर्तव्यावर आहे.” आईला पाहताच तरुणीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. तिने आईला घट्ट मिठी मारली आणि “आता मी कुठेही जाणार नाही,” असा शब्द दिला.
आई–मुलीच्या या हृदयस्पर्शी भेटीच्या क्षणी उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. पोलिस निरीक्षक स्वाती केदार, पोलिस उपनिरीक्षक वसंतराव शेळके, गणेश केदार, निर्मला कोलते, तसेच माणुसकी समूहातील सुमित पंडित आणि पूजा पंडित हेही या क्षणाने भावूक झाले.
माणुसकी समूहाची मोठी मदत
यावेळी पोलिस उपनिरीक्षक वसंतराव शेळके यांनी सांगितले की, “एखाद्या अधिकाऱ्याकडे अधिकृत तपास नसला तरी सामाजिक जबाबदारी म्हणून काम केल्यास त्याला यश नक्की मिळते. ही तरुणी सहा वर्षांपूर्वी जालना पोलिस ठाण्यात मिसिंग म्हणून नोंद होती. तिची बहीण मुंबईत राहत असल्याचे समजताच तातडीने संपर्क साधला आणि नातेवाईकांची भेट घडवून आणली. या संपूर्ण प्रक्रियेत माणुसकी समूहाची मोठी मदत झाली.” तसेच, माणुसकी समूहाने आतापर्यंत तब्बल 40 बेवारस व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत सुरक्षित पोहोचवले असल्याची माहितीही त्यांनी दिली.






