छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरीमध्ये तीन दिवसांपूर्वी दिसलेल्या बिबट्यांचा अद्यापही शोध लागला नाही. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळं त्या परिसरात असलेल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. वनविभाग आणि स्थानिक पोलिसांच्या 100 जणांच्या टीमकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. सोमवार आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या याच परिसरात फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले होते. तर गुरुवारी हा बिबट्या प्रोझोन मॉल परिसरामध्ये फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यामुळे उल्कानगरीत सोमवारपासून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. वन विभागाने उल्कानगरी, खिवंसरा पार्क व पोदार शाळेजवळ पिंजरे लावले आहेत. या बिबट्याला पकडण्यासाठी शहरात एकूण पाच ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहे.
advertisement
नाशिक येथील ४, जुन्नर येथील ११ वनरक्षक कर्मचाऱ्यांसह छत्रपती संभाजीनगर येथील ९० कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. बुधवारी वन विभागाने उल्कानगरीपासून ते पैठण रोडवरील बेस्ट प्राइसपर्यंत बिबट्याचा शोध घेतला. परंतु बिबट्या असल्याचा कोणताही सुगावा आढळला नाही. झाडाझुडपांत पिंजरा ठेवला असून भक्ष्य म्हणून त्यात शेळी ठेवली आहे. याशिवाय बिबट्याला जाळे लावून पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अजूनही या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं नाही.