जालना ते जळगाव या 174 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी सिल्लोड तालुक्यात जमिनींचे अधिग्रहण करण्याची प्रक्रियेला गती मिळाली आहे. पुढील महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने भूमिअभिलेख विभागाकडे शुल्क भरून प्राथमिक टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असून, भविष्यात या मार्गामुळे प्रवासासोबतच व्यापारी देवाणघेवाणीला मोठी चालना मिळणार आहे.
advertisement
Beed Railway: बीडकरांची स्वप्नपूर्ती! अहिल्यानगर-बीड रेल्वे सुरू; थांबे, वेळापत्रक आणि तिकीट दर
जालना ते जळगाव या रेल्वे मार्गासाठी पुढील महिन्यापासून सिल्लोड-सोयगाव तालुक्यात जमिनींची मोजणी केली जाणार असून, या टप्प्यात सुमारे 195 हेक्टर क्षेत्र अधिग्रहित होणार आहे. या संदर्भात 2 जुलै रोजी सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून भूमिअभिलेख विभागाला संयुक्त मोजणीसाठी लेखी आदेश जारी करण्यात आले होते. त्यानंतर भूमिअभिलेख विभागाने रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार पूर्ण करून, सिल्लोड शहरासह तालुक्यातील 12 गावांतील मोजणी शुल्क जमा करण्याबाबत रेल्वेला अधिकृतरीत्या कळवले आहे. त्यामुळे या बहुचर्चित रेल्वे प्रकल्पाच्या कामकाजाला प्रत्यक्षात गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जमीन मोजणीसाठी पैसे जमा
जालना-जळगाव रेल्वे मार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्याच्या दृष्टीने सिल्लोड तालुक्यातील प्रक्रिया निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. रेल्वे प्रशासनाने जमीन मोजणीसाठी आवश्यक असलेली 1 कोटी 16 लाख 10 हजार रुपयांची रक्कम भूमिअभिलेख विभागाकडे जमा केली आहे.
12 गावांत जमीन मोजणी
पुढील महिन्यापासून सिल्लोड शहरासह वरूड (खुर्द), पिंपळगाव (पेठ), भवन, मंगरूळ, डोंगरगाव, लिहा, पालोद, अनाड, उंडणगाव, अंधारी, बाळापूर आणि काजीपूर या 12 गावांमध्ये अधिकृत मोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रत्यक्ष पाया रचण्याची तयारी झाली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.