छत्रपती संभाजीनगर : अनेकांच्या बकेट लिस्टमध्ये असते की, एकदा तरी क्रूझमधून प्रवास करावा. क्रूझमध्ये बसून मज्जा करायची म्हटलं की, लगेच सर्वांच्या नजरेसमोर गोवा हे ठिकाण येते. गोवा हे सुंदर समुद्रकिनारे, समुद्री खाद्यपदार्थ, नाइटलाइफ आणि क्रूझ पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
गोव्यात समुद्रात मोठमोठ्या जहाजातून प्रवास करणे हा पर्यटकांसाठी एक आनंददायी अनुभव असतो. याच क्रूझ पर्यटनाचा आनंद आता आगामी काही दिवसांत गोदावरी नदीत घेता येणार आहे. विशेष म्हणजे अगदी परवडणाऱ्या दरात हा आनंद घेता येणार आहे.
advertisement
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन धोरण 2024 तयार करण्यात आले आहे. यात राज्यातील सागरी किनारपट्टीचा पर्यटनासाठी वापर करण्यात येणार आहे. क्रूझ पर्यटन निर्माण करण्याचे धोरणही त्यात समाविष्ट आहे. मात्र, केवळ समुद्र किनारेच नाहीत, तर यात राज्यातील काही नद्यांवरही क्रूझ पर्यटन विकसित करण्यात येणार आहे. यात गोदावरी नदीचा समावेश करण्यात आला आहे. परवडणारे क्रूझ पर्यटन विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
गोदावरी नदी राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पश्चिम घाटातील त्र्यंबकेश्वर येथून उगवते. ती दख्खन पठार ओलांडून पश्चिमेकडून पूर्व घाटापर्यंत वाहते. गोदावरी नदीची लांबी 1 हजार 456 कि.मी. आहे. त्याचा मुख्य प्रवाह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेडसह तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधून वाहतो आणि शेवटी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतो.