खंडाळा येथील प्रकाश मोहन दळवे वय 40 आणि त्यांची पत्नी सुरेखा दळवे हे दाम्पत्य अल्पभूधारक असून मोलमजुरी आणि ऊसतोडीचे कामही करतात. 24 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता त्यांच्या घरात नवरात्रोत्सवानिमित्त देवीचे घट बसविण्यात आलेले होते. या घटासमोर दिवा पेटविण्यात आलेला होता. दरम्यान घरात असलेल्या पेट्रोलच्या बाटलीचा या दिव्याच्या संपर्कात येताच भडका उडून घरात आग लागली.
advertisement
या आगीत घरातील प्रकाश मोहन दळवे, त्यांची पत्नी राधा ऊर्फ सुरेखा प्रकाश दळवे, मुलगा आकाश दळवे आणि अविनाश दळवे हे गंभीररीत्या भाजले. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणून त्यांना तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचारादरम्यान 4 ऑक्टोबर शनिवारी सायंकाळी 6 वाजता अविनाश याचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्यरात्री 1 वाजता आकाश याचीही प्राणज्योत मालवली. तर प्रकाश दळवे आणि त्यांची पत्नी सुरेखा दळवे यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.
दोन्ही मुलांचे आई-वडील प्रकाश आणि सुरेखा दळवे हे सुद्धा गंभीर भाजलेले असून, ते घाटी रुग्णालयात अजूनही उपचार घेत आहेत. धक्का सहन होऊ शकणार नाही, यामुळे त्यांना मुलांचे निधन झाल्याची कल्पनाही देण्यात आलेली नाही.
मुलांना मुंबईला उपचारासाठी नेलंय, असं सांगितलं आहे. अविनाश आणि आकाश या दोन्ही भावंडांमध्ये प्रचंड जिव्हाळा होता. शाळा, खेळ, अभ्यास सर्व काही एकत्र करायचे. अपघातात भाजल्यानंतर दोघांवर घाटी रुग्णालयात शेजारीच उपचार सुरू होते. यातील अविनाशचा शनिवारी सायंकाळी 6 वाजता मृत्यू झाल्याने आकाश प्रचंड अस्वस्थ झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. यानंतर त्यानेही मध्यरात्री 1 वाजता आकाश देखील मृत्य झाला.