छत्रपती संभाजीनगर : आपल्याकडे एक म्हण आहे की प्रेम हे आंधळं असतं. एकदा माणूस प्रेमात पडला की त्याला चांगलं वाईट किंवा पुढे काय होईल याची काहीच चिंता नसते. प्रेमात पडलेली माणसं ही एखाद्या व्यक्तीबरोबर प्रेम केलं तर त्याचं फक्त मन बघतात. असंच आंधळं प्रेम हे छत्रपती संभाजीनगर शहरातील पल्लवी दलाल आणि निकेत दलाल यांनी केलं आहे. त्यांच्या प्रेमाची गोष्ट आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
advertisement
शहरातील नागेश्वरवाडी भागामध्ये पल्लवी आणि निकेत हे राहतात. दोघांचं घरासमोर घर असल्यामुळे दोघांचं बालपण सोबतच गेलं. निकेत आणि पल्लवी यांनी शहरातील सरस्वती भुवन शाळेमध्ये शिक्षण घेतलं. निकेत आणि पल्लवीमध्ये घट्ट मैत्री होती. कालांतराने याच मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं. दोघंही दररोज भेटायचे आणि फिरायला जात असतं.
एकाच दिवशी एकाच मुलाशी तीनदा आंतरधर्मीय विवाह, 50 पैशांसाठी रोजंदारी, आता मोठं काम!
एक दिवस दोघे फिरायला गेल्यानंतर दुचाकीवरून जात असताना निकेत यांना अचानकपणे डोळ्याला अंधाऱ्या आल्या. ते घरी आल्यानंतर तातडीने डॉक्टरांकडे गेले आणि जाऊन डोळ्याची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की निकेत यांना काचबिंदू झाला आहे. भविष्यात कधीही निकेत यांची दृष्टी जाऊ शकते, असं डॉक्टरांनी सांगितलं. दृष्टी जाऊ शकते हे ऐकताच निकेत यांच्या पायाखालची जमीन सरकली.
भविष्यामध्ये आपली दृष्टी जाईल हे पल्लवी यांना कसं सांगायचं हा निकेत पुढे मोठा प्रश्न होता. ते दोघे नेहमी ज्या ठिकाणी भेटायचे त्याच ठिकाणी भेटले आणि निकेत यांनी पल्लवीला सगळं सांगितलं. मला काचबिंदू झालेला आहे आणि भविष्यामध्ये माझी दृष्टी जाईल, असं निकेत यांनी पल्लवी यांना सांगितलं. पल्लवीच्या पायाखालची जमीन सरकली. तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं. निकेत पल्लवीला यांना असं म्हणाले की आपण लग्न करायला नको.
पण पल्लवी निकेतला असं म्हणाल्या की, मी काही जरी झालं तरी सुद्धा तुझ्या सोबत आहे आणि मला तुझ्या सोबतच लग्न करायचं आहे. दोघांनी ठरवलं एकमेकांशी लग्न करायचं. दोघंही इंटरकास्ट असल्यामुळे लग्नामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण होता. पल्लवी धाडस करून तिच्या घरी तिच्या आई-वडिलांना सर्व सांगितलं. सुरुवातीला तिचे आई-वडील लग्नासाठी तयार नव्हते पण पल्लवीने त्यांना समजावून सांगितलं व त्यानंतर आई-वडील दोघेही लग्नासाठी तयार झाले आणि दोघांनी कुटुंबाच्या आशीर्वादाने आणि साक्षीने 2007 साली लग्नगाठ बांधली.
लग्नापूर्वी पल्लवी एका खाजगी बँकेमध्ये नोकरी करत होत्या. निकेत हे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत होते. दोघांचा सुखाचा संसार चालू असताना 2012 साली निकेत यांची दृष्टी गेली. निकेत दृष्टी गेल्यामुळे पूर्णपणे मानसिक रित्या खचून गेले होते. त्यांना या सर्वामधून बाहेर काढण्यासाठी पल्लवी यांनी मोलाची साथ दिली. पल्लवी यांनी निकेत यांना त्याचं मन दुसऱ्या गोष्टीत रमावं म्हणून स्विमिंग आणि सायकलिंगचा छंद असल्यामुळे तो सुरू करण्याचा सल्ला दिला. मात्र सुरुवातीला अडचणी आल्या. सर्व अडचणींवरती मात करत निकेत यामध्ये परफेक्ट झाले. निकेत यांना आयरन मॅन म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पल्लवी नोकरी सोडून स्वतःचा मसाल्यांचा व्यवसाय करतात तर निकेत हे शिक्षण विभागात प्रादेशिक विद्या प्राधिकरण विभागामध्ये काम करतात. गेल्या 18 वर्षांपासून दोघांचा सुखी संसार सुरू आहे. त्यांना एक मुलगाही आहे.