एकाच दिवशी एकाच मुलाशी तीनदा आंतरधर्मीय विवाह, 50 पैशांसाठी रोजंदारी, आता मोठं काम!
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Local Hero: अनेक संकटांवर मात करत अमरावतीतील समाज कार्यकर्त्या रझिया सुलताना यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलीये. केवळ शिक्षणानंच आपल्या आयुष्यात क्रांती झाल्याचं त्या सांगतात.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती: समाजातील काही घटक पिढ्यानपिढ्या मुख्य प्रवाहापासून वंचित असतात. अनेक संकटांना सामोरं जात ते वेदनादायी जीवन जगत असतात. अशा घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते आपलं आयुष्य पणाला लावतात. अमरावतीतील रझिया सुलताना या असंच मोठं काम करत असून समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी मोठं काम करत आहेत. एक उत्कृष्ट लेखिका म्हणून देखील त्यांचा लौकीक असून लोकल18 च्या माध्यमातून त्यांचा प्रवास जाणून घेऊ.
advertisement
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात अडगाव हे रझिया सुलताना यांचं माहेर आहे. तेथील परिस्थिती अतिशय हालाखीची होती. वडील शिंपी काम करत होते. तर आई हातमजुरी करायची. आईबरोबर आम्ही भावंडं सुद्धा शेतात जात होतो. त्यावेळी शेतातील गवताचे गंज उचलण्यासाठी 50 पैसे मिळत होते आणि गवत काढण्यासाठी 1 रुपया मिळत होता. रोज कमवायचं आणि त्याचंच खायचं अशी घरची स्थिती होती, असं रझिया सांगतात.
advertisement
आंतरधर्मीय विवाह
मला शिक्षणाची आवड होती. त्यामुळे वाचन खूप जास्त करत होते. तेव्हा लिखाणाची आवड सुद्धा होत गेली. असं करत करत मी दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन आणि डीएड केलं. त्यानंतर 2 वर्ष शाळेवर नोकरी केली. नोकरी सुरू असतानाच मी मुस्लिम धर्मीय मुलाशी आंतरधर्मीय विवाह केला. एकाच दिवशी एकाच मुलाशी तीन वेळा मी लग्न केले, असं रझिया सुलताना सांगतात.
advertisement
सासरी अडचणींचा सामाना
रझिया पुढं सांगतात की, “सासरी असताना मला नोकरी सोडावी लागली. माझ्या सासरी माझ्यासोबत काही अशा घटना घडल्या ज्यामुळे मी भांबावून गेले होते. मात्र, हार न मानता मी माझे स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. लिखाण सुरू केले आणि जोमाने चळवळीत आले. मला आधीच टेबलवर काम करणे आवडत नव्हते. हळूहळू मी समाजात वावरत गेले. अनेक समस्या सोडवत गेले, माझा संसारही सुरळीत होऊ लागला.”
advertisement
शिक्षणामुळंच हे शक्य..
“आतापर्यंत अनेक पुस्तकं लिहिली. समाजातील अनेक बाबी हाताळल्या. त्यातून खूप अनुभव आलेत. शेतात काम करताना अनेक वेळा डोक्यावरून विमान जात होतं. तेव्हा वाटायचं की, विमानात बसल्यावर कसं वाटत असेल. आता माझं विमानात बसायचं स्वप्न देखील पूर्ण झालं. ज्यांच्या शेतात कामाला जायचो, ते पैसे देताना आमच्या हाताला हात लागू देत नव्हते. आज त्यांच्याच संस्थेमध्ये व्याख्यानासाठी बोलावतात, घ्यायला येतात. हा संपूर्ण बदल फक्त आणि फक्त शिक्षणामुळंच शक्य झाला. मुलींनी धाडसी रहावं, म्हणजे आयुष्यात आलेला प्रत्येक प्रसंग सहज निकाली लावता येतो,” असंही रझिया सांगतात.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Feb 11, 2025 3:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
एकाच दिवशी एकाच मुलाशी तीनदा आंतरधर्मीय विवाह, 50 पैशांसाठी रोजंदारी, आता मोठं काम!








