गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. प्रभादेवी चौकाच्या सुशोभिकरणाच्या कामाचे उद्घाटन माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते झाले. त्यावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्षेप घेतला. स्थानिक आमदार महेश सावंत असून आता महापालिकेवर प्रशासक आहेत. तर, कोणत्या अधिकारात हा उद्घाटन सोहळा पार पाडला असा सवाल ठाकरे गटाने केला. त्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले. दोन्ही गटांनी आपल्याकडेच वर्क ऑर्डर असल्याचा दावा केला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटात यावरून आरोप प्रत्यारोप सुरू केला आहे.
advertisement
दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
प्रभादेवी सर्कल येथील कामावरून दोन्ही गटातील ही बाचाबाची ही दादर पोलीस ठाण्यात पोहचली आहे. दादर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधीही दोन्ही गटात झालाय राडा...
प्रभादेवी दादर हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. एकनाथ शिंदे यांच्या बंडात तत्कालीन माहिमचे आमदार सदा सरवणकर यांनी साथ दिली. त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आणि स्थानिक माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे देखील शिंदे गटात गेले. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात तणावाची स्थिती आहे. दोन वर्षांपूर्वीदेखील गणपती विसर्जनाच्या दरम्यान, याच ठिकाणी दोन्ही गटांमध्ये राडा झाला होता. त्यावेळी सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. शिंदे गटासोबत झालेल्या राड्यामुळे सावंत आणि इतर शिवसैनिकांना अटक झाली होती.
विद्यमान आमदार असलेले महेश सावंत हे शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. पण शिवसेनेतील फाटाफुटीनंतर महेश सावंत हे सदा सरवणकर यांचे सध्याचे कट्टर विरोधक समजले जातात. विधानसभा निवडणुकीत सावंत यांनी सरवणकरांचा पराभव करत प्रतिष्ठेची माहिमची निवडणूक जिंकली.