या 14 गावांचा चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा व जिवती तालुक्यात समावेश करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विधानभवनातील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराज भोंगळे, जिवती तालुक्यातील 14 गावांचे प्रतिनिधी ग्रामस्थ, तसेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती होती.
advertisement
गावकऱ्यांनी आपल्या समस्या व मागण्या मंत्र्यांसमोर स्पष्टपणे मांडल्या. त्यावर तत्काळ प्रतिसाद देत महसूलमंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला त्वरेने आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे सीमाभागातील गावांना शासकीय योजनांचा लाभ, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रस्ते व पाणीपुरवठा यांसारख्या सेवा मिळवण्यासाठी दरवाजे खुले होणार आहेत. अनेक वर्षांपासून या गावातील रहिवासी महाराष्ट्रात समावेश होण्याची मागणी करत होते.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनंतर आता लवकरच या गावांच्या महाराष्ट्रात अधिकृत समावेशासाठी अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सीमाभागातील नागरिकांना न्याय मिळणार असून त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
ही प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर, या गावांचा महाराष्ट्रात समावेश अधिकृतपणे मान्य केला जाईल आणि त्यांना सर्व शासकीय सुविधा नियमित स्वरूपात मिळू लागतील. ही कृती केवळ प्रशासकीय निर्णय नसून, सीमाभागातील जनतेच्या आशा-आकांक्षांना दिलेले उत्तर आहे. राज्य शासनाचा हा निर्णय लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतिक ठरत असून, सीमावर्ती भागातही विकासाचा प्रकाश पोहोचवणारा ठरणार आहे.