वसई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या निकालाच्या मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. तसंच रवींद्र वायकर यांच्याकडे ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल फोन असल्याचं वृत्त एका वृत्तपत्राने दिलं, त्यानंतर हा वाद वाढला. याप्रकरणी निवडणूक आयोगाने तातडीची पत्रकार परिषद घेऊन या बातमीमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं. तसंच ईव्हीएमसाठी कोणत्याही ओटीपीची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं. याचसोबत वृत्तपत्राविरोधात अब्रुनुकसानची दावा करणार असल्याचा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे. याप्रकरणी रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'जे खोटे आणि दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला पोलीस उत्तर देतील. ये गिरे तो भी टांग उपर. तुम्ही जागा जिंकल्या तर इव्हीएमवर संशय घेतला नाही. फक्त रवींद्र वायकरच्या इथे संशय, म्हणजे याचा अर्थ तुम्ही लोकांमध्ये खोटं पसरवण्याचं काम करत आहात. वायकरांना जनतेने निवडून दिलं आहे, तुम्ही कितीही आदळआपट करा', असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
'शिवसेनेच्या धनुष्यबाणाला 14.5 टक्के मतं मिळाली आहेत. मुंबई-महाराष्ट्रात आम्हाला त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्त मिळाली आहेत. उद्धव ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट 42 टक्के आहे, आमचा 48 टक्के आहे, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे', अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
'यावेळी महाविकासआघाडीने गावागावात जाऊन संविधान बदलणार, आरक्षण कमी करणार हे खोटं पसरवलं. फेक नरेटिव्ह पसरवलं, ही मतं तात्पुरती आहेत. मोदी हटाव केलं पण ते हटले नाहीत. उलट हटने वाले हट गये,' असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.